Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

अमृत योजनेची कामे तात्काळ पूर्ण करा :- भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांची महानगरपालिकेकडे मागणी

schedule13 Dec 23 person by visibility 100 category

योजनेतील विलंबाबाबत प्रश्न विचारत प्रशासनाला केले निरुत्तर
 
कोल्हापूर दि.13 केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून 2015 मध्ये अटल मिशन फॉर रिजुवेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (AMRUT) ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात मूलभूत नागरी सुविधा पुरविण्याचा उद्देश आहे. कोल्हापूर शहरासाठी 2018 मध्ये अमृत पाणीपुरवठा योजनेची सुरुवात झाली आहे परंतु, आज पर्यंत देखील या योजनेचे काम रखडलेल्या अवस्थेत आहे. या विषयात आज भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, या योजनेचे ठेकेदार प्रतिनिधी तुषार दांडगे त्याचबरोबर याविषयातील संबंधित अधिकारी यांची भेट घेऊन सर्वांना धारेवर धरले.
महापालिका चौकात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र महापालिकेच्या कारभाराबद्दल तीव्र घोषणा देण्यात आल्या. कामात विलंब करणा-या महापालिका अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, या कंपनीच्या ठेकेदाराचा धिक्कार असो, भ्रष्ट अधिकाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. या भेटी प्रसंगी भाजपा पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला अनेक प्रश्न विचारून निरुत्तर केले. यावेळी भाजपा पदाधिकारी यांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये प्रशासक, ठेकेदार प्रतिनिधी, संबंधित अधिकारी यामध्ये कोणताही समन्वय नसल्याचे निदर्शनास आले. उपस्थित सर्व अधिकारी आपण एक वर्षापूर्वीच या पदावर आलो आहे हे एकच उत्तर देत राहिले त्यामुळे या योजनेसाठी प्रमुख जबाबदार कोण असा सवाल या ठिकाणी उपस्थित राहिला.
याप्रसंगी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी, अमृत योजनेतील प्रलंबित कामांचा आढावा घेतला. ०१/०९/२०१८ रोजी या दास कंपनीला वर्कऑर्डर देण्यात आली. २ वर्षामध्ये काम पूर्ण करण्याचा करार होता परंतु ५ वर्षे होऊनही अद्यापही हि योजना पूर्ण न झालेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत जीवन प्राधिकरणचे अधिकारी, जल अभियंता, संबंधित ठेकेदार यांच्याकडे या विलंबाचा जाब विचारला. 396 किलोमीटर पाईपलाईन पैकी 348 किलोमीटरची नवीन पाईपलाईन 48 किलोमीटरची रिप्लेसमेंट पाईपलाईन, तसेच पाण्याच्या टाक्यांना जोडणारी ३० किलोमीटर पाईपलाईन अशा एकूण ४२६ किलोमीटर पैकी जवळपास १३० किलोमिटर पेक्षा जास्त पाईपलाईनचे काम अपूर्ण आहे. १२ टाक्यांपैकी ४ टाक्यांचे काम सुरु असून उर्वरीत टाक्या किती महिन्यात पूर्णत्वास येईल असा सवाल केला. दोन संकचे काम अद्यापही प्रलंबित का असा खडा सवाल करत अतिशय संत गतीने सुरू असणाऱ्या प्रशासनाचा अंकुश नसणाऱ्या या योजनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. देशाच्या पंतप्रधानांची महत्त्वकांक्षी योजना असणारी ही योजना कोल्हापुरात कोणत्या कारणाने रखडली आहे ? या कंपनीला तीन वेळा मुदतवाढ कोणत्या कारणातून देण्यात आली ? कंपनीने मुदतीत काम पूर्ण न केल्याबद्दल महापालिकेच्या वतीने नऊ कोटी रुपयांचा दंड अद्याप का वसूल केलेला नाही ? या योजनेत आडकाठी करणाऱ्या लोकांची नावे जाहीर करावीत अशा लोकांवर पोलीस कारवाई करावी, कोल्हापूरच्या जनतेची दिशाभूल करणाऱ्या या कामाची श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी यावेळी उपायुक्तांकडे करण्यात आली.

भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, प्र.का.सदस्य राहूल चिकोडे यांनी अधिकाऱ्यांना या प्रश्नावर चांगलेच धारेवर धरले. राजारामपुरी, फुलेवाडी येथील काम कोणाच्या दबावामुळे प्रलंबित ठेवले आहे यावर अधिकारी, ठेकेदार प्रतिनिधी निरुत्तर झाले. शहरात आगामी काळात ९० कोटीचे रस्ते होणार आहेत हे नवीन रस्ते झाल्यावर हे तुमच्या अपयशामुळे, भ्रष्ट्राचारामुळे प्रलंबित राहिलेले काम होऊन देणार नाही असे सांगीतले तसेच हे काम मुदतीत पूर्ण न करू शकणाऱ्या या कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये का टाकले नाही ? असा सवाल केला. या योजनेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची भूमिका काय ? असा सवाल करत सर्वसामान्यांच्या करातून सुरू असणाऱ्या या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप याप्रसंगी त्यांनी केला.
भाजपा शिष्टमंडळाच्या प्रश्नावर उपायुक्त रविकांत अडसूळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता राजेंद्र ताडे, दास कंपनीचे प्रतिनिधी तुषार दांडगे सर्व निरुत्तर झाले. त्यानंतर उपायुक्त रविकांत अडसुळ यांनी जल अभियंता नेत्रदिप सरनोबत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपअभियंता राजेंद्र ताडे, संबधित ठेकेदार प्रतिनिधी यांच्यासोबत तात्काळ बैठक घेऊन ही योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्याचबरोबर या सर्वांचा समन्वय साधून योजना पूर्ण होण्यासाठीचा ॲक्शन प्लॅन कंपनीकडून घेतला जाईल, योजनेमध्ये आडकाठी करणाऱ्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देत याबाबतचे लेखी पत्र भारतीय जनता पार्टीला देणार असल्याचे सांगितले. यावेळी राजू मोरे, उमा इंगळे, सुमित पारखे यांनी आपल्या भागात सुरू असणाऱ्या या कामांची त्रुटी निदर्शनास आणून दिली.
याप्रसंगी सरचिटणीस डॉ.सदानंद राजवर्धन, गायत्री राऊत, अजित ठाणेकर, राजू मोरे, विराज चिखलीकर, गणेश देसाई, शैलेश पाटील, उमा इंगळे, माधुरी नकाते, विजयसिंह खाडे, अतुल चव्हाण, रशीद बारगीर, रोहित पवार, अमर साठे, प्रदीप उलपे, गिरीश साळुंखे, आज़म जमादार, संतोष माळी, सचिन तोडकर, अमोल पालोजी, हर्षद कुंभोजकर, सुमित पारखे, रविकिरण गवळी, सुनील पाटील, प्रसाद नरूले, सुभाष माळी, योगेश साळुंखे, अनिल पाटील, अवधूत भाट्ये इ. पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes