कॉल्पोस्कोपी आणि पॅथॉलॉजी व स्त्रीरोग संघटनेच्या वतीने तीन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन
schedule08 Apr 25 person by visibility 118 categoryआरोग्य
कोल्हापूर/ प्रतिनिधी: इंडियन सोसायटी ऑफ कॉल्पोस्कोपी अँड सर्व्हायकल पॅथॉलॉजी आणि कोल्हापूर स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र संघटनेच्या वतीने गर्भाशय मुख कॅन्सर आणि त्याला प्रतिबंधित करणारी साधने म्हणजे कॉल्पोस्कोपीवरील सतराव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १८ ते २० एप्रिल दरम्यान ही परिषद हॉटेल सयाजीमध्ये होणार आहे. त्या अनुषंगाने १८ एप्रिल रोजी वैद्यकीय कार्यशाळा डॉ.डी वाय पाटील हॉस्पिटल येथे घेण्यात येणार आहे. यामध्ये कॉल्पोस्कोपी आणि त्यांच्या द्वारे करण्यात येणार्या शस्त्रक्रिया यांचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले जाणार आहे.
गर्भाशय मुख कॅन्सरचे प्रमाण स्त्रीयांमध्ये वाढले असून हा आजार दुसर्या क्रमांकावर आहे. हा कर्करोग टाळण्यासाठी सध्या लस उपलब्ध आहे. हा कर्करोग होण्यापूर्वी याचे निदान करता येते आणि त्याचे उपचार पिशवी न काढताही करता येतात.हा कॅन्सर होऊ नये म्हणून मुली आणि स्त्रियांना प्रतिबंधात्मक लस दिली जाते. मुलांना पण ही लस देता येते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक माहिती वर या परिषदेत चर्चा होणार आहे.
गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर एचपीव्ही या व्हायरसमुळे होतो.एखाद्या स्त्रीला याची लागण झाली आहे का, हे साध्या तपासणीत कळून येते. याबद्दलचे प्रशिक्षणसुध्दा देण्यात येणार आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेला इंडियन सोसायटी ऑफ कॉल्पोस्कोपी अँड सर्व्हायकल पॅथॉलॉजीच्या अध्यक्षा डॉ. लीला दिगूमूर्ती ,सचिव डॉ. पिनका वामसी खजिनदार डॉ. श्वेता बालानी उपस्थित राहणार आहेत. परिषदेचे उद्घाटन शनिवारी दिनांक 19 एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता दिल्ली येथील एम्स हॉस्पिटलचे प्रमुख आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. नीरजा भाटला यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.डॉ विजय झुतशी, डॉ. सरिता शामसुंदर, डॉ. भाग्यलक्ष्मी नाईक,यांच्यासह तज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई येथील डॉ. उषा सरैया प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सोलापूर येथील डॉ.सुमन सरदेसाई माननीय पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती परिषदेच्या आयोजक आणि अध्यक्षा
डॉ. भारती अभ्यंकर ,सचिव डॉ.बबन पाटील, खजिनदार डॉ.दीपाली पाटील,तसेच कोल्हापूर स्त्री रोग व प्रसूती शास्त्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. मनिषी नागावकर,सचिव डॉ. रणजीत किल्लेदार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच
या परिषदेच्या निमित्ताने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. देवल क्लब येथील गोविंदराव टेंबे सभागृहात बुधवार दिनांक ९ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता सदरचा कार्यक्रम होणार आहे. या परिसंवादास सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.