Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

निळा कार्बन, खारफुटी वनाचे महत्व आणि संवर्धन

schedule07 Apr 21 person by visibility 990 categoryशैक्षणिक

 निळा कार्बन, खारफुटी वनाचे महत्व आणि संवर्धन:

नैसर्गिक पर्यावरणात खारफुटी वनांना महत्व आहे. खाऱ्या जमिनीमध्ये फुटणारे झाडे त्यास खारफुटी वने किंवा तीवर असे म्हटले जाते. किनारी प्रदेशात खाडीमध्ये या प्रकारची वने आढळतात. वातावरणातील कार्बन कमी करण्यासाठी खारफुटी वने, सागरी वनस्पती आणि दलदलीतील जीवसंस्था महत्त्वाच्या आहेत. सागरातील बंदिस्त कार्बन साठी 'निळा कार्बन' ही संज्ञा अलीकडच्या काळात वापरली जात आहे. हवामान बदलाला मानव निर्मित कार्बन मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे त्यामुळे कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी निळा कार्बन उपयुक्त आहे. निळा कार्बन म्हणजे महासागर आणि किनारी परिस्थितीने संचलित केलेला कार्बन होय. सागरी सजीव त्यांना लागणारा कार्बन हा समुद्री गाळामधून आणि किनारी जैव वनस्पतीच्या माध्यमातून घेतात व हा कार्बन खारफुटी वने, सागरी गवत व प्रवाळ या माध्यमातून साठवला जातो या वनस्पती कार्बन शोषून घेण्यास मदत करतात. खारफुटी जंगलामध्ये वातावरणातील हिरव्या वनस्पती पेक्षा दहापट कार्बन शोषून घेण्याची ताकद आहे. परंतु दुर्दैवाने त्याची जाणीव व माहिती लोकांना नसल्यामुळे जगभरातील निम्म्या खारफुटी वनस्पती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे खारफुटी संवर्धनासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. भारताला एकूण 7516 कि.मी लांबीची सागरी किनारपट्टी लाभली आहे तर महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटर किनारपट्टी लाभली आहे. त्यामुळे किनारी भागात खारफुटी वने आढळतात. जगातील सर्वात मोठे खारफुटी वन भारतामध्ये सुंदरबन या ठिकाणी आहे. गंगा व ब्रम्हपुत्रा त्रिभूज प्रदेशात सुंदरबन या ठिकाणी 180 पेक्षा जास्त प्रजाती दिसून येतात त्यामुळे त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. जागतिक वारसा स्थळामध्ये या प्रदेशाची नोंद असून येथील जैवविविधतेचे संर्वधन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ओडिसातील भितरकणिका हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे खारफुटी वन आहे. या प्रदेशामध्ये ही विविध प्रकारच्या वनस्पती आहेत. बाराटंग बेट येथील खारफुटी वने, भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील ओडिसा ते तामिळनाडू मधील गोदावरी कृष्णा नद्यांच्या डेल्टा मधील खारफुटी वने महत्त्वाचे आहेत. खारफुटी वनांचे महत्व व उपयोग अनेक आहेत. समुद्रात होणारी तेल गळती, विविध प्रकारचा कचरा, रसायनांचे प्रदूषण इत्यादी खारफुटी वनस्पती शोषून घेतात व ते पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. सागरी पाण्यातील प्रदूषण कमी करण्याची ताकद या खारफुटी मध्ये जास्त आहे. मासे, खेकडे, किटकांचे अन्न व मानवी आरोग्याच्या दृष्टीने ही खारफुटी महत्वाची आहे. महापुराची तीव्रता कमी करते त्यामुळे किनारी भागाचे होणारे नुकसान थांबते. समुद्रातील वाळू उपसा, किनारी भागातील अतिक्रमण, भराव घालून जमिनी तयार करणे, खारफुटी जंगलांची तोड आदी कारणामुळे सध्या जगभरातील ही जंगले नष्ट होत आहेत त्याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे त्यामुळे त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. खारफुटी वनाचे महत्व प्रत्येकाला समजणे गरजेचे आहे त्यामुळे या वनांचे संवर्धन होण्यास मदत होईल.

डाॅ युवराज शंकर मोटे

भूगोल व पर्यावरण अभ्यासक,

कोल्हापूर

मो: 9923497593

ईमेल: ysmote@gmail.com

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes